लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. महायुतीच्या जागावाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या 48 जागावाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप दिलं गेलं असून, मुंबईतील सहापैकी चार जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसला जागा मिळणार असून, शरद पवार यांची राष्ट्रवादी कॅाग्रेस जागांच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे.
आंबेडकर-शेट्टींना ठाकरेंच्या कोट्यातून जागा
शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वाधिक जागा दिल्या जाण्याबद्दल मविआची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोट्यातूनच दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघावर एकमत झालं असलं, तरी काही मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष जोर लावताना दिसत आहे. महाविकास आघाडीत काही मतदारसंघाबाबत रस्सीखेच सुरू आहे. बैठकीत हे दिसून आलं. मतदारसंघ जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील ६ पैकी ठाकरेंना ४ जागा
मुंबईत लोकसभेच्या ६ जागा आहेत. यापैकी ३ जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या जातील, असे म्हटले जात होते. पण, मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात.
चार मतदारसंघावरून रस्सीखेच
महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील या लोकसभा मतदारसंघासाठी चढाओढ दिसली. या मतदारसंघात उमेदवार किंवा पक्षांची अदलाबदल होऊ शकते, असेही सुत्रांनी सांगितले.
रायगड ( ठाकरे गट X शरद पवार राष्ट्रवादी)
कोल्हापूर (ठाकरे गट X काँग्रेस )
अमरावती ( ठाकरे गट X शरद पवार राष्ट्रवादी)
भंडारा (शरद पवार राष्ट्रवादी X काँग्रेस )